आंबेगाव पोलिसांनी ५ गुन्हे आणले उघडकीस : दुचाकीसह ४ लाखांचा माल केला जप्त
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : दुचाकी चोरून त्याचाच वापर करून महिला व पुरुषांच्या गळ्यातील सोनसाखळ्या हिसकावून घेणाऱ्या रेकॉर्डवरील गुन्हेगाराला आंबेगाव पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून एकूण ५ गुन्हे उघडकीस आले असून सोन्याचे दागिने व दुचाकी असा ३ लाख ९२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
आरोपीचे नाव आकाश नरहरी शिंदे (रा. जाधवनगर, वडगाव) असे आहे. त्याच्याकडून आंबेगाव पोलीस ठाण्यातील २, तर बावधन, खडक आणि सिंहगड रोड पोलीस ठाण्यातील प्रत्येकी १ असा एकूण ५ गुन्ह्यांचा छडा लावण्यात पोलिसांना यश मिळाले.
आंबेगाव आणि सिंहगड रोड पोलीस ठाण्यातील चैन स्नॅचिंग प्रकरणातील सोन्याचे दागिने तसेच गुन्ह्यात वापरलेली दुचाकी असा एकूण ३ लाख ९२ हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. २ मे २०२५ रोजी फिर्यादी यांनी आपली दुचाकी जुना सातारा रोडवरील गुजरवाडीजवळ रस्त्याच्या कडेला पार्क करून झोप घेतली असताना, आरोपीने त्यांच्या खिशातील मोबाईल आणि दुचाकी चोरून नेली होती.
दरम्यान, पोलीस अंमलदार हनुमंत मासाळ आणि चेतन गोरे आरोपीचा शोध घेत असताना त्यांना माहिती मिळाली की, रेकॉर्डवरील आरोपी आकाश शिंदे हा दरी पुलाच्या जवळ येणार आहे. माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवून पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले. तेथे आकाश शिंदे याला ताब्यात घेण्यात आले. पुढील तपासात त्याच्याकडून आणखी ५ गुन्हे उघडकीस आले.
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते, सहायक पोलीस आयुक्त राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद झिने, पोलीस निरीक्षक गजानन चोरमले, पोलीस उपनिरीक्षक मोहन कळमकर, पोलीस अंमलदार शैलेंद्र साठे, चेतन गोरे, हनुमंत मासाळ, निलेश जगदाडे, हरिश गायकवाड, सुभाष मोरे, धनाजी धोत्रे, सचिन गाडे, ज्ञानेश्वर चित्ते, नितीन कातुर्डे, योगेश जगदाळे, शिवाजी पाटोळे, अजय कामठे, प्रमोद भोसले आणि राकेश टेकवडे यांनी सहभाग घेतला.



















